ऑनलाईन माहितीची पडताळणी सुरू अहिल्यानगर (प्रतिनिधी)- 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यतेसाठी लागणारी माहिती ही यू-डायस प्लस पोर्...
ऑनलाईन माहितीची पडताळणी सुरू
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यतेसाठी लागणारी माहिती ही यू-डायस प्लस पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नोंदींवर आधारित राहणार आहे. ही संच मान्यता अंतिम करण्यासाठी विद्यार्थ्यांची आकडेवारी ही यू-डायस तर शिक्षकांची माहिती ही शालार्थ प्रणालीवरून घेण्यात आली आहे. गुरूजींची पदे राहणार की जाणार यासाठी संच मान्यता महत्वाची असून सध्या ही माहिती अंतिम करण्याचे काम सुरू आहे. साधारण 15 जानेवारीपर्यंत संच मान्यतेवर अखेरचा हात फिरवला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
यंदा शिक्षण विभागाकडून शाळांना एक महत्त्वाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी सरल पोर्टल आणि यू-डायस प्लस पोर्टल या दोन्ही ठिकाणी स्वतंत्रपणे माहिती भरावी लागत होती. मात्र आता ही प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून सर्व आवश्यक विद्यार्थी माहिती फक्त यू-डायस प्लस पोर्टलवरच नोंदवावी लागेल. 30 मे 2025 रोजी झालेल्या बैठकीत याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुढे संच मान्यतेसाठी लागणारी माहिती देखील केवळ यू-डायस प्लस पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नोंदींवर आधारित राहील.
यंदाची संच मान्यता अंतिम करतांना विद्यार्थी संख्या विचारात घेतांना 30 सप्टेंबर 2025 अखेर पटावर असलेल्या आधार-वैध विद्यार्थी संख्येवरच विचार करण्यात येणार आहे. तसेच या तारखेनंतर आधार पडताळणी पूर्ण केलेले विद्यार्थी किंवा नव्याने झालेल्या नोंदी संच मान्यता किंवा दुरुस्ती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. संच मान्यतेच्या वेळी 30 सप्टेंबरअखेर पटावर असलेला प्रत्येक विद्यार्थी योग्य वयानुसार संबंधित वर्गात दाखल झाला आहे याची खात्री करून घेण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील सर्व विद्यार्थी नोंदींची आधार पडताळणी पूर्ण करावी, अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत.
.................
पडताळणी झाल्यावर...
दरम्यान, शिक्षण विभागाच्या पुणे येथील कार्यालयाकडून आलेल्या संचमान्यतेची माहिती जिल्ह्यात तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या पातळीवर पडताळणी करण्यात येत आहे. संबंधीत माहिती ही ऑनलाईन असल्याने तीची पडताळणी झाल्यावर पुन्हा पुणे येथील कार्यालयाला कळवल्यावर संच मान्यतेला मान्यता दिल्यावर नगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या पदाची संख्या समोर येणार आहे.
......................
यंदा शिक्षक अतिरिक्त?
नगर जिल्ह्यात यंदा प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा अंदाज शिक्षण विभागातील अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होतांना दिसत असून त्याचा परिणाम संचमान्यतेवर होणार असल्याने जिल्ह्यात शिक्षकांची पदे धोक्यात येण्याची शक्यता आहे.
.....................

COMMENTS