मुंबईच्या लेकींचाही डंका manoja vaidya [nashik] (प्रतिनिधी) भारतीय प्रजासत्ताकाच्या 77 व्या गौरवशाली सोहळ्याचे वारे दिल्लीत वाहू लागले असतान...
मुंबईच्या लेकींचाही डंका
manoja vaidya [nashik] (प्रतिनिधी)
भारतीय प्रजासत्ताकाच्या 77 व्या गौरवशाली सोहळ्याचे वारे दिल्लीत वाहू लागले असतानाच यंदा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बँडच्या निनादाने देशाला भुरळ घातली आहे. प्रजासत्ताक दिन 2026 च्या निमित्ताने संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचा महाअंतिम सोहळा दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे पार पडला. या मानाच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील दोन शाळांनी उत्तुंग यश संपादन करून राज्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या 18 संघांच्या अटीतटीच्या लढतीत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी सैनिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांनी ब्रास बँड श्रेणीत थेट प्रथम क्रमांकावर मोहर उमटवली. संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या धूनने उपस्थित प्रेक्षकांसह परीक्षकांचीही मने जिंकली. दुसरीकडे मुंबईच्या विक्रोळी येथील डॉन बॉस्को हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यायाच्या मुलींच्या ब्रास बँड पथकाने आपल्या कौशल्याचे दर्शन घडवत तृतीय पारितोषिक पटकावले. महाराष्ट्राच्या या ङ्गरणरागिणीफ आणि बालसैनिकांच्या कामगिरीचे दिल्लीच्या दरबारात कौतुक होत आहे.
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते या विजेत्यांना रोख रक्कम, चषक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या तज्ज्ञ अधिकार्यांनी या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण केले. प्रथम क्रमांकाच्या संजीवनी शाळेला 51 हजार रुपये, तर डॉन बॉस्को शाळेला 21 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
देशातील 763 शाळांमधून निवडले गेलेले तब्बल 2,217 विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी झाले होते. राज्य आणि विभागीय पातळीवरील खडतर प्रवास पार करत हे विद्यार्थी राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचले. यात सीबीएसई, आयसीएसई आणि सैनिक स्कूल अशा विविध स्तरांवरील शाळांचा सहभाग होता. राष्ट्रीय स्पर्धेत 18 संघांनी ब्रास बँड व पाईप बँड श्रेणीत स्थान मिळवण्यासाठी लढा दिला. एकीकडे महाराष्ट्राने विजयाची गुढी उभारली असताना, तामिळनाडूच्या अविला कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी विशेष कला सादरीकरणाची संधी मिळाली आहे. थंडीने गारठलेल्या दिल्लीत कोपरगावच्या ग्रामीण भागातून निघालेला हा बँडचा आवाज आणि मुंबईच्या गजबजलेल्या विक्रोळीतून गेलेल्या मुलींची कामगिरी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वीच मिळालेल्या या यशाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

COMMENTS