शासनाची अधिसूचना जारी पुणे - राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत...
शासनाची अधिसूचना जारी
पुणे - राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे कार्यकर्ते आणि नागरिकांनाही प्रचारसंभांची उत्सुकता लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडूनही तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून ईव्हीएमसह प्रशासकीय तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे. तर, राज्य सरकारनेही 15 जानेवारी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिका क्षेत्रात मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे, कामगार, कर्मचारी आणि शासकीय व निमशासकीय ठिकाणी काम करणार्यांना मतदानादिवशी सुट्टी असून मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील, पण कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.दरम्यान, मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
COMMENTS