शासनाचा उपक्रम : देशभक्तीपर गाण्यांवर कवायत करणार विद्यार्थी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रजासत्ताकदिनी यंदा प्रथमच राज्यभर शिक्षण विभाग...
शासनाचा उपक्रम : देशभक्तीपर गाण्यांवर कवायत करणार विद्यार्थी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रजासत्ताकदिनी यंदा प्रथमच राज्यभर शिक्षण विभागातर्फे नवा प्रयोग केला जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील 3 शाळा निवडून तेथे प्रजासत्ताकदिनी एकसारखी कवायत केली जाणार आहे. त्यानंतर याचे फोटो, व्हीडिओ शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केेले जाणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांत अशा 42 शाळांची निवड शिक्षण विभागाने केली आहे.
शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाधिकार्यांना देशभक्तीपर गाण्यांचा व्हिडिओ पाठविला आहे. 26 जानेवारीला ध्वजवंदन झाल्यावर शाळांच्या वेळेनुसार पहिली ते बारावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी एकसारखी कवायत करतील. त्याचे व्हिडिओ, फोटो सर्व शाळांना शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शाळा, तसेच माध्यमिक दीड हजार शाळा अशा एकूण पाच हजार शाळा आहेत.
दरवर्षी प्रजासत्ताकदिनी या सर्व शाळांमध्ये वेगवेगाळे सांस्कृतिक, देशभक्तीपर कार्यक्रम व्हायचे. परंतु यंदा देशभक्तीपर गाण्यांवर या 42 शाळांमधील विद्यार्थी एकसारखी कवायत करतील. शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाधिकार्यांना तशा सूचना केल्या असून शिक्षणाधिकार्यांनी सर्व 42 मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन त्यांना तसे आदेश दिले आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने पाठवलेल्या त्या व्हिडिओमधील देशभक्तीपर गाण्यांवरच कवायती कराव्या लागणार आहेत.
................
गावकरी, पालकांचीही उपस्थिती
देशाच्या 77 वा प्रजासत्ताकदिनी यंदा पहिल्यांदाच या शाळांमध्ये एकसारखी कवायत पार पडणार आहे. विद्यार्थी समोर कवायती करतील, मागे देशभक्तीपर गाणे लावली जातील. त्याचे व्हिडिओ, फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहेत. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून वेबसाइट तयार केली जाणार आहे. त्याची लिंक सर्व शाळांना दिली जाईल. या कार्यक्रमासाठी संपूर्ण पालकांनी, ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, अशाही सूचना शिक्षणाधिकार्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

COMMENTS