किमान तापमानात चढ-उतार मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट बघायला मिळाली होती. विशेष करून अहिल्यानगरसह विदर्भात तर पारा अगदी ...
किमान तापमानात चढ-उतार
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट बघायला मिळाली होती. विशेष करून अहिल्यानगरसह विदर्भात तर पारा अगदी 10 अंशाच्याही खाली आला होता. मात्र, आता ही थंडी ओसरताना दिसत आहे. उत्तरेकडील कमी झालेले थंड वारे आणि ढगाळ हवामान यामुळे राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे हवेतील गारठा देखील कमी झाल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी धुके आणि दव पडल्याचे दिसून येत आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 10 अंशांपार गेला आहे. त्यामुळे गारठा कमी झाला आहे. राज्यात मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 32.2 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव येथे 9.2 अंश सेल्सिअस, तर अहिल्यानगर आणि भंडारा येथे 10 अंश तापमानाची नोंदले गेले आहे.
याशिवाय विदर्भातही थंडीची लाट ओसरताना दिसते आहे. अकोला किमान तापमानाचा पारा 15.1 अंशावर गेला आहे. तर अमरावतीत 14.5, भंडारा 10, बुलडाणा 15.6, चंद्रपूर 15.8, गडचिरोली 15.8, गोंदिया 11.2, नागपूर 12.7, वर्धा 14, वाशीम 13, तर यवतमाळमध्ये किमान तापमान 14.4 अंश नोंदवण्यात आले आहे.

COMMENTS