शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात? मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदे सेनेला काठावरचे बहुमत मिळाल्यानंतर आता मुंबईच...
शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात?
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदे सेनेला काठावरचे बहुमत मिळाल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईचा महापौर कोण होणार, यावरुन सध्या प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईत सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी महापौर पदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा होईल, असे वक्तव्य करुन सस्पेन्स वाढवला होता. या सगळ्या घडामोडी सुरु असताना मुंबईत पडद्यामागे गुप्तपणे वाटाघाटी सुरु असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यानुसार ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या दाव्होस आर्थिक परिषदेसाठी परदेशात गेले आहेत. या काळात दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ठाकरे गटाकडून आपल्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यात आल्याची कुणकुण लागल्याने एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँडस् एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याचे समजते. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापना होईपर्यंत या नगरसेवकांना हॉटेलमध्येच ठेवले जाणार आहे.
एकीकडे शिवसेनेचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना धोका असला तरी त्याचवेळी त्यांच्यासमोर नवी संधीही निर्माण झाली आहे. भाजपचे 89 नगरसेवक निवडून आल्याने त्यांना 114 हा मॅजिक फिगरचा आकडा गाठण्यासाठी एकनाथ शिंदे यांची मदत घेणे अपरिहार्य आहे. हीच गरज ओळखून एकनाथ शिंदे यांच्याकडून अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाची समान वाटणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात करावी. तसेच स्थायी समिती व इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बीएमसीतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या हालचालींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय सुत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाचे काही नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. शिंदे गटाच्या या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केल्याची माहिती आहे. आमच्या मनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी कोणतेही वैर नाही, असे या नगरसेवकांनी सांगितल्याचे समजते. या सगळ्या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांनी महापौरपदाबाबत सूचक वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. मजर देवाची इच्छा असेल तर मुंबई महानगरपालिकेचा पुढचा महापौर आपला असेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलसुलट चर्चांना प्रचंड उधाण आले आहे.

COMMENTS