राज्यातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाचा वारु चौखूर उधळला असून मुंबई, पुण्यासह अनेक महापालिका काबीज करण्यात यश मिळविले आहे. ...
महापालिका निवडणुकीत भाजपने मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी काही ठिकाणी शिवसेनेशी (एकनाथ शिंदे) युती केली, तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढविल्या. भाजपने मुंबईत १३७ जागा लढविल्या व शिंदे यांना ९० जागा दिल्या. मतमोजणीच्या दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भाजपने लढविलेल्या जागांच्या तुलनेत मोठे यश मिळवीत ९० हून अधिक जागांवर बाजी मारली आणि ७०-८० टक्के जागा जिंकल्या. तर शिंदे यांना लढविलेल्या जागांपैकी जेमतेम ३५-४० टक्के म्हणजे ३० जागांपर्यंत मजल मारता आली. शिवसेनेने २०१७ च्या निवडणुकीत ८४ जागा जिंकून पालिकेत सत्ता मिळविली होती. त्या सर्व जागांसह १२५ जागा देण्याची मागणी शिंदे यांनी भाजपकडे केली होती. मात्र भाजपने ती फेटाळून लावत शिंदे यांना ९० जागा देवूनही त्यापैकी एकतृतीयांश पेक्षाही कमी जागा शिवसेनेला जिंकता आल्या. मुंबईवर आता आपलेच वर्चस्व आहे, हे सिद्ध करण्यात भाजपला यश मिळाले आणि भाजपची साथ असूनही शिंदे यांना मोठा फटका बसला.
एमएमआर क्षेत्रावरही भाजपचे वर्चस्व
ठाणे जिल्हा, नवी मुंबईत शिंदे यांचे वर्चस्व होते. कल्याण-डोंबिवलीत शिंदे यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी अजिबात पटत नाही व या निवडणुकीतही वाद झाले. नवी मुंबईत भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गणेश नाईक यांनी शिंदे यांना उघड आव्हान दिले. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व मोडून काढण्यात भाजपला यश मिळाले. मीरा-भाईंदर, पनवेल, वसई-विरार या महापालिकांमध्येही भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजपने काही महापालिकांमध्ये शिंदे यांच्याशी युती करूनही अनेक जागांवर शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपला शिवसेनेचा फायदा झाला, मात्र शिवसेनेला भाजपचा फारसा उपयोग न होता मोजक्याच जागा जिंकता आल्या, असे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे.
पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
पुणे, पिंपरी-चिंचवड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अजित पवार व शरद पवार यांची युती होती. भाजपने पुणे व पिंपरी-चिंचवडमध्येही आपली ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात त्यासाठी मोठी तयारी केली होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह काही नेत्यांवर जबाबदारी देवून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळविण्यात भाजपने यश मिळविले. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आपली ताकद असल्याने अजित पवार यांच्याशी भाजपची युती होवू शकली नव्हती. राज्यात ज्या ठिकाणी शक्य होईल, तेथे युती करायची, असे धोरण महायुतीने ठरविल्याचे फडणवीस, शिंदे व पवार यांनी सांगितले होते. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये युती न केल्याचा फायदा भाजपला झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गड काबीज करण्यात यश मिळाले.

COMMENTS