त्यांनी ठरवलं आहे, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही पुणे- Sharad Pawar On Sunetra Pawar And Ajit Pawar सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधी सोह...
त्यांनी ठरवलं आहे, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही
पुणे- Sharad Pawar On Sunetra Pawar And Ajit Pawar सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधी सोहळ्यावर विचारले असता मला माहिती नाही, मी सकाळी वाचलं, असं शरद पवार म्हणाले. अजित पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतला. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीती दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. प्रफुल पटेल, सुनील तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ठरवलं आहे, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार गेली अनेक वर्षे संघटनेचं काम करत होते. अजित पवार सामान्यांशी सुसंवाद ठेवून काम करणारा कर्तृत्वान नेता होता, असं शरद पवारांनी सांगितले. अजित पवारांना लोकांच्या प्रश्नांची सखोल माहिती होती. लोकांना न्याय देण्याचं काम अजित करत होता. दैनंदिन कामाची सुरुवात पहाटेच व्हायची. आज अजित पवार हयात असते तर घरी दिसले नसते, फिल्डवर असते, असं शरद पवार म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात याबाबत गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. त्याचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते. आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं. हा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचं, ही तारीख अजितदादा यांनी दिली होती. दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती. पण, अचानक ही घटना झाली. दादांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा आहे, असं शरद पवारांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आगामी काही दिवसांत एकत्र येणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

COMMENTS