पालिका, ग्रामपंचायत पकडणार अन् खच्चीकरण करणार पशुसंवर्धन विभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील ...
पालिका, ग्रामपंचायत पकडणार अन् खच्चीकरण करणार पशुसंवर्धन विभाग
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील ग्रामपंचायत व नगरपरिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना येणार आहेत. यासाठी नगरपालिका हद्दीत पालिकेची यंत्रणा तर ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतींची यंत्रणा भटके कुत्रे पकडून ते पशुसंवर्धन विभागाकडे सोपवणार आहेत. पशुसंवर्धन विभाग या कुत्र्यांवर खच्चीकरणाची शस्त्रक्रिया करून पुन्हा संबंधित यंत्रणांच्या ताब्यात देणार आहेत. दरम्यान, भटक्या कुत्र्यांवरून पालिका, ग्रामपंचायत आणि पशुसंवर्धन विभागाच्या डोक्याचा ताप वाढला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या ठिकाणी असणारे भटके कुत्रे पकडण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे अथवा आखण्यात येत आहे. पकडण्यात येणारे ही भटके कुत्रे शेल्टर हाऊस (निवारा) केंद्रात ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर शस्त्रक्रिया केंद्र उभारून केंद्रात संबंधित भटक्या कुत्र्यांचे खच्चीकरण (निर्बिजीकरण) करणार आहेत. ही शस्त्रक्रिया झाल्यावर दोन दिवस पशुसंवर्धन विभागाच्या देखरेखीनंतर पुन्हा हे भटके कुत्रे पुन्हा त्या यंत्रणा (पालिका अथवा ग्रामपंचायतींच्या) ताब्यात देण्यात येणार आहेत.
प्रजनन नियंत्रण केंद्र
जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी श्वान प्रजनन नियंत्रण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी ठेवण्यात येणार्या पशूधन विकास अधिकारी यांना कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पशूसंवर्धन विभागाकडून याबाबत कार्यवाही सुरू आहे.बिबट्या व भटकी कुत्र्यांमुळे त्रस्त
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या एकीकडे बिबट्या तर दुसरीकडे भटकी कुत्री यामुळे नागरिक आणि विविध शासकीय यंत्रणांना त्रस्त झालेल्या आहेत. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात अडीच लाख नागरिकांचे लचके भटकी कुत्र्यांनी तोडलेले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात सध्या हीच भटकी कुत्रे बिबट्याचे सोपे शिकार असल्याचे दिसत आहे. यामुळे सध्या बिबट्या आणि कुत्र्यांनी नगरकर त्रस्त असल्याचे दिसत आहे.
55 ते 60 हजार भटकी कुत्री
जिल्ह्यात सध्या ग्रामीण आणि शहरी भाग मिळून सुमारे 55 ते 60 हजार भटकी कुत्रे असल्याचा अंदाज आहे. यात पशूसंवर्धन विभागाकडील आकडेवारीनुसार ग्रामपंचायत हद्दीत 43 ते 45 हजार भटकी कुत्रे तर उर्वरित 15 पालिकांच्या हद्दीत 12 ते 15 हजार असे जिल्ह्यात सुमारे 55 ते 60 हजार भटकी कुत्रे असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

COMMENTS