दहा गटविकास अधिकार्यांसह नव्या सभापतींना मिळणार कोरी करकरीत गाड्या अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत ग्रामीण भागात विकासाचा...
दहा गटविकास अधिकार्यांसह नव्या सभापतींना मिळणार कोरी करकरीत गाड्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत ग्रामीण भागात विकासाचा गाडा हाकणार्या गटविकास अधिकारी यांच्यासह पंचायत समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदेत नव्याने निवडून येणार्या सभापती यांच्यासाठी नवीन कोरी वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी वाहनाच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या घसारा निधीतून सुमारे दीड कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषदेत शासकीय अधिकारी यांच्यासह पदाधिकारी यांच्यासाठी सरकारने वाहनासह इंधनाची तरतूद केलेली आहे. ही वाहनेे खरेदी करण्यासाठी सरकारने जिल्हा परिषदेला घसारानिधीतून खर्च करण्यास परवानगी दिलेली आहे. जिल्ह्यातील 14 पैकी 10 गटविकास अधिकारी आणि दोन पंचायत समितीचे सभापती यांची वाहने कालबाह्य झालेली आहेत. या वाहनांचा लिलाव करून त्या ठिकाणी आता नव्याने वाहने खरेदी करण्यात येणार आहे.
यात नेवासा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी आणि सभापती, संगमनेर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी आणि सभापती, अकोले गटविकास अधिकारी, राहाता गटविकास अधिकारी, जामखेड गटविकास अधिकारी, श्रीगाेंंदा गटविकास अधिकारी, शेवगाव आणि कर्जत गटविकास अधिकारी यासाठी सुमारे 9 लाख या प्रमाणे 12 वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.
तसेच जिल्हा परिषदे निवडणूका झाल्यानंतर नव्याने निवडून येणारे विषय समित्यांचे सभापती यांच्यासाठी नव्याने वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. ही वाहने संबंधीतांच्या पसंती खरेदी करण्यात येणार असून या चार वाहनांसाठी प्रत्येकी 10 लाख प्रमाणे 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

COMMENTS