अशी काही चर्चा सुरू असती तर अजितदादांनी आपल्याला सांगितले असते- फडणवीस मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमं...
अशी काही चर्चा सुरू असती तर अजितदादांनी आपल्याला सांगितले असते- फडणवीस
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर, काल (शनिवार) सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची तारीख निश्चित झाली होती असेही सांगितले जात आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. अशी काही चर्चा सुरू असती तर अजित पवारांनी आपल्याला याबद्दल सांगितले असते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा अंतिम टप्प्यात होती आणि याची तारीख देखील निश्चित झाली होती याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, चर्चा कुठल्याही अंतिम टप्प्यावर गेली असती, तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं. आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर, ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे शरद पवार यांच्याबरोबर त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही.
त्यांनी आमच्याशी चर्चा करावी
समजा अजित पवार हे अशा प्रकारच्या कुठल्याही एकत्रिकरणाची चर्चा जर करत होते, तर ती कुठलीही चर्चा भाजपाशी चर्चा केल्याशिवाय करतील का? ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपाशी चर्चा केली असेल, ते जर करत नसतील तर ती वेगळी गोष्ट आहे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची किंवा नाही करायची, विलिनीकरण करायचं हे सर्वस्वी 100 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन (अधिकार क्षेत्र) आहे. आमची अपेक्षा एवढी असेल की कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी एकदा चर्चा करावी आणि ते करतातच, पुढेही करतील. समजा अजित पवार अशा प्रकारच्या चर्चा करत होते, तर ती चर्चा ते एनडीएतून बाहेर पडण्यासाठी करत होते का? ते सरकारमधून बाहेर पडणार होते का? ते सरकारमध्ये पूर्णपणे स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि आपली इकोसिस्टम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धत अयोग्य आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवारांचे निधन झाल्या त्याच्या आदल्या दिवशी आपण त्यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो असेही फडणवीसांनी नमूद केले. ते म्हणाले की, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय? काय घडतंय, हे सगळं मला दिसतंय. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते, त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तासभर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे याबाबत शेवटी खालच्या थराचं राजकारण करणं योग्य नाही. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला.
आज दोन वेगवेगळे पक्ष झाले आहेत. अजित पवारांच्या पक्षाने निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी आमच्या पक्षाचं नेतृत्व करावं आणि त्यांनी निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरिता शपथविधी करावा, सुनेत्राताईंनी तो शपथविधी केला. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पहिल्या दिवसापासून सांगतोय की राष्ट्रवादी काँग्रेस हा एक स्वतंत्र अस्तित्व असलेला पक्ष आहे. त्यांचे निर्णय तेच घेतात. एक गोष्ट आहे की आम्ही त्यांचे सहकारी आहोत आणि ते आमच्याबरोबर राहिलेत, त्यामुळे आम्ही त्यांच्या निर्णयांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

COMMENTS