दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी; फडणवीस अहिल्यानगर - अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर बारामती येथ...
दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी; फडणवीस
अहिल्यानगर - अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर बारामती येथील पोटनिवडणूक होणं बाकी आहे. तसंच राहुरीची पोटनिवडणूकही बाकी आहे. याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. दोन्ही निवडणुका बिनविरोधा व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. तामिळनाडू, आसाम, केरळ, पुदूचेरी या राज्यांची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसोबत देशातील विविध राज्यातील विधानसभांच्या 8 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राहुरी आणि बारामतीसाठी 23 एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.
बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकांची घोषणा झाली असून या दोन्ही निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असेल. पण आमच्यावर जर निवडणूक लादली गेली तर आम्हीही निवडणूक लढायला तयार आहोत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39 वा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी बहाल करण्यात आली. या सन्मानामुळे मुख्यमंत्री आता डॉक्टर देवेंद्र फडणवीस झाले आहेत. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पोटनिवडणुकीवर भाष्य केले.
लाल दिवा आणि तावडे
रितू तावडे यांच्या गाडीच्या लाल दिव्याबाबत जी चर्चा होते आहे त्याची मी माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर नव्हता. बोनेटच्या ठिकाणी लाल दिवा होता. त्यात महापौरांचा दोष नाही. राज्यात कुणीही लाल दिवे वापरु नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. महापौरांना त्याची कल्पना आहे. मला वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट केलं जातं आहे. त्यांना टार्गेट करणं योग्य नाही. असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
इंधन तुटवड्याबाबत मुख्यमंत्री
नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशांप्रमाणे वागलं पाहिजे. काही राजकीय पक्ष लोकांमध्ये कारण नसताना भीतीचं वातावरण तयार करत आहेत. त्यामुळे चांगली परिस्थिती खराब होण्याची स्थिती निर्माण होते आहे.लोक साठेबाजी करतील त्यामुळे ही भीती निर्माण केली तर. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशांवर विश्वास लोकांनी ठेवला पाहिजे.

COMMENTS