चांदी 10 हजारांनी वाढली मुंबई - सोन्यांच्या भावात पुन्हा एकदा वाढ होत आहे. देशात सोन्याचा भाव झपाट्याने वाढून आपल्या सर्वकालीन उच्चांकाजवळ ...
चांदी 10 हजारांनी वाढली
मुंबई - सोन्यांच्या भावात पुन्हा एकदा वाढ होत आहे. देशात सोन्याचा भाव झपाट्याने वाढून आपल्या सर्वकालीन उच्चांकाजवळ पोहचत आहे. देशाची राजधानी दिल्लीत आणि राज्यातही सोन्याचा भाव वेगाने वाढताना दिसतोय. दरम्यान, सुवर्ण बाजारात तर सोन्याचे भाव आज रॉकेटच्या वेगाने वाढले, यात सोनं तब्बल 2,025 रुपयांनी वाढून 1,40,780 रुपयांवर व्यवहार करत होते.
इराणमधील सुरू असलेल्या निदर्शनांमुळे निर्माण झालेला भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या संघर्षात हस्तक्षेप करण्याची शक्यता यामुळे आज सोन्याच्या भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आकडेवारीनुसार दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,42,300 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,30,450 रुपये इतका आहे. एकाच दिवसात सोनं तब्बल 1,700 रुपयांनी महागलं आहे. सध्याचा भाव बघता सोनं आपल्या उच्चांकाच्या जवळ पोहोचले आहे. येत्या आठवड्यात मकर संक्रांत, पोंगल यांसारखे अनेक सण असल्यामुळे बाजारात खरेदी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे भाव आणखी वाढू शकतात असं बाजार तज्ञांच मत आहे.
आकडेवारीनुसार, 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,34,980 रुपये होता तो आता 12 जानेवारीला 1,42,300 झाला आहे. त्यामुळे केवळ नवीन वर्षाच्या पहिल्या 12 दिवसांतच सोन्याच्या भावात 5.1 % वाढ दिसून आली आहे.दरम्यान चांदीमध्ये 22,000 हजार रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये 1 जानेवारीला चांदीचा भाव 2,38,000 होता. आजचा भाव 2,70,000 रुपये आहे. त्यामुळे 12 दिवसांतच चांदी तब्बल 13.4 % वाढली आहे. देशभरात चांदीने तर गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. मागच्या केवळ 5 महिन्यांमध्ये चांदीचा भाव प्रति किलो 1,13,000 रुपयांवरून आज 2,70,000 रुपये झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली असली तरी गुंतवणूकदार मात्र खुश आहेत.
महाराष्ट्रातील सोनं-चांदी
देशभरात सोनं-चांदी वाढत असताना राज्यातही भाव झपाट्याने वाढले आहे. आज महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, छ,संभाजीनगर, कोल्हापूर आणि जळगाव येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,42,150 रुपये आणि 22 कॅरेटचा भाव 1,30,030 रुपये इतका आहे. तर चांदीचा भाव प्रति किलो तब्बल 2,70,000 रुपये आहे.

COMMENTS