2029 च्या निवडणुकीबाबत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले भाकीत बीड - राज्यातील महापालिकांच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत...
2029 च्या निवडणुकीबाबत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले भाकीत
बीड - राज्यातील महापालिकांच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत, आता जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत, राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालावर भाष्य केलं. मुंबईसह महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या यशावर बोलताना त्यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई आणि पुण्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. ज्या पुण्यात अजित पवारांनी मोफत मेट्रो आणि बससेवा देण्याची घोषणा केली होती, त्या पुण्यात अजित पवारांना केवळ 27 जागा जिंकता आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेतही अजित पवारांना मोठं अपयश पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आल्याचं दिसून येत आहे.
अजित पवारांच्या पराभवाचं कारण सांगत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपलाही इशारा दिलाय. भाजपवाले कलाकार आहेत, त्यांनी सगळ्यांचा काटा काढला. अजित पवारांनी नासके लोक आपल्यासोबत ठेवल्यामुळे त्यांना मराठ्यांचे मतदान पडलं नाही. सन 2029 च्या निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलित एक झाले तर भाजपाला चिरडतील, असे भाकीतही जरांगे पाटील यांनी केले. बीड जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे आज मनोज जरांगे पाटील यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या यशावर भाष्य करत अजित पवारांवर टीका केली. महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अशाबद्दल प्रश्न विचारला असता यांनी बघायला काही ठेवलंच नाही, हे लई कलाकार आहेत. भाजपने पहिली महाविकास आघाडी संपवली, आता शिंदेचा आणि अजित दादाचा काटा काढला.
अजितदादा पण असे लोक सांभाळतो, त्यामुळे लोक लांब चालले आहेत, त्यांना आता कळालं. पापी लोक, रक्ताने माखलेले लोक सोबत ठेवले तर असे परिणाम भोगावे लागतील. अजित दादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे. आपण असे नासके लोक सोबत ठेवले म्हणून आपल्यावर इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही. नाहीतर पुण्यात अजित दादाला इतके कमी यश भेटलं नसतं. भाजप त्या लोकांना का जवळ करत नाही, यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं. दोन नासके सांभाळल्यामुळे मराठा समाज दूर गेला. त्यामुळे महानगरपालिकेला केवळ मराठ्यामुळेच पडावं लागलं, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली. तसेच, नाव न घेता धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
मराठा, मुस्लिम, दलित एक झाल्यास चेंगरतील
एमआयएमच्या यशाबद्दल देखील मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली. मुसलमान, दलित, मराठे एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो. म्हणूनच मी दलित मुस्लिम आणि मराठ्यांना सांगत असतो की, यांना एकदा पायाखाली चेंगरा 2029 च्या निवडणुकीत चेंगरतील असं दिसतं, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं.

COMMENTS