मुंबईच्या महापौरपदाबाबत अजिबात तडजोड करु नका भाजपचा दिल्लीतून आदेश मुंबई- पहिल्यांदाच बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकून मुंबई काबीज क...
मुंबईच्या महापौरपदाबाबत अजिबात तडजोड करु नका भाजपचा दिल्लीतून आदेश
मुंबई- पहिल्यांदाच बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकून मुंबई काबीज करणार्या भाजपसमोर महापौरपदावरुन नवी डोकेदुखी उभी राहिली आहे. यंदा भाजपने कोणत्याही परिस्थितीत आपल्या पक्षाचा महापौर मुंबई महानगरपालिकेत बसवायचाच, असा चंग बांधला होता. मात्र, भाजपला निवडणुकीत 89 जागाच जिंकता आल्या. त्यामुळे 114 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज लागणार आहे. भाजपची हीच अडचण ओळखून एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद पहिल्या अडीच वर्षांसाठी आपल्याला मिळावे आणि स्थायी व इतर समित्यांमध्ये योग्य वाटा मिळावा, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेत तणाव निर्माण झाला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी महत्त्वाचा संदेश पाठवला आहे. त्यानुसार भाजप मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करायला तयार नाही.
मुंबई महानगरपालिकेत भाजपने अधिक जागा जिंकल्या असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदावर आपलाच हक्क असल्याचे मित्रपक्षांना सांगा, असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्त्वाने देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपला मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगरपालिकेत इतके निर्णायक आणि मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे महापौरपदावर भाजपचाच हक्क कसा आहे, ही भूमिका मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसमोर मांडा. मात्र, हे करताना कोणतीही कटुता येणार नाही, याचीही दक्षता घ्या, असे भाजपच्या पक्षनेतृत्त्वाने देवेंद्र फडणवीस यांना कळवल्याची माहिती आहे.मुंबई महापौरपद आपल्याकडेच यायला हवे, ही भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना आहे. या भावनेचा सन्मान केला पाहिजे. ही गोष्ट शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पटवून द्या. याशिवाय, मुंबई महानगरपालिकेतील अन्य पदे आणि अन्य महानगरपालिकांमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादीशी चर्चा करुन सन्मानजनक तोडगा काढा, असेही भाजपच्या नेतृत्त्वाने देवेंद्र फडणवीसांना सांगितले आहे.

COMMENTS