भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव मुंबई- राज्यातील 29 जिल्ह्यांच्या पालिका निवडणुकीत ( Maharashtra Municipal Corporation Electi...
भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव
मुंबई- राज्यातील 29 जिल्ह्यांच्या पालिका निवडणुकीत (Maharashtra Municipal Corporation Election Result 2026) अपेक्षित निकाल न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. पालिका निवडणुकांमध्ये पक्षातील मंत्री आणि आमदार यांच्या सुमार कामगिरीवर एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पक्षातील मंत्री आणि आमदारांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती. मात्र ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाहीत. त्यामुळे जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल घेत, शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदेंनी याबाबत पालिका निवडणूकीपूर्वीच मंत्र्यांना संकेत दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पालिका निवडणूक ही सेनेच्या मंत्र्यांसाठी लिटमस्ट टेस्ट होती असे बोलले जाते. त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी सोपवून शिंदे नव्या चेहर्यांना मंत्रीपदाची संधी देणार असल्याचं समोर येत आहे. जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीत पक्ष जरी दुसर्या क्रमांकावर असला तरी अपेक्षित कामगिरीही नेत्यांकडून झाली नसल्याने मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळतो आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं आहे.
ताज हॉटेलमधील पॉलिटिक्सला वेग
नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंची मुंबईत धावाधाव सुरु आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नव निर्वाचित नगरसेवकांचा पालिकेतील मगटफ आज स्थापन केला जाणार आहे. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया ही आज करून गट नेत्यांची निवड केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गट नेत्यांच्या यादीत यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले सारख्या तरुण अनुभवी नगरसेवकांच्या नावाची चर्चा सुरु आहे. आज गट स्थापन करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया केल्यास नगरसेवक फुटीबाबत निश्चंत राहता येईल. त्या अनुषंगाने शिवसेनेत हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिंदेंना मुंबईत फटका का बसला?
भाजपने मेरिटवर प्रत्येक जागेवर चर्चा करून त्यातील फक्त 90 जागा शिवसेनेला दिला. या जागा देतानाही भाजपने भविष्यातील त्या जागांवरचा क्लेम लक्षात ठेवूनच त्या जागा शिवसेनेला सोडल्या, यातही शिंदेंनी अनेक जागा घराणेशाही म्हणून वाटल्या, यात तुकाराम काते वगळता इतर नेत्यांना त्यांच्या घरातील व्यक्ती निवडणूनच आणता आला नाही. यात माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलं, खासदार रविंद्र वायकर यांची मुलगी, राहुल शेवाळे यांची भावजय, आमदार अशोक पाटील, मंगेश कुडाळकर यांच्या मुलांना पराभव पत्करावा लागला. मग काय म्हणून शिंदेंनी या नेत्यांकडे पाहून त्यांच्या मुलांना तिकीट दिल्या, असे प्रश्न स्थानिक कार्यकर्ता खासगीत उपस्थित करतात. ऐन निवडणुकीत शिंदेना जागा वाटप चर्चा आणि युतीत कल्याण डोबिंवली, ठाणे अंबरनाथ इथेच बांधून ठेवले. याचाच प्रमुख फटका मुंबईत बसल्याचं बोललं जात आहे

COMMENTS