मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील मतोफ नियम ठरणार महत्त्वाचा मुंबई- मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेने बाजी म...
मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील मतोफ नियम ठरणार महत्त्वाचा
मुंबई- मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेने बाजी मारली असली तरी आता मुंबईचा महापौर कोण होणार, यावरुन नवे राजकारण रंगले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला म्हणजे गुरुवारी काढली जाणार आहे. यामध्ये कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या जातीसाठी आरक्षित होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदा महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे. तसे झाल्यास भाजप आणि शिंदे सेनेला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. तब्बल 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट माहिती असल्यामुळेच त्यांनी, मदेवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल, हे वक्तव्य जाणीवपूर्वक केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी चक्राकार पद्धतीने सोडत काढली गेल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाईल. जुन्या चक्राकार पद्धतीने यंदा मुंबईचे महापौरपद अनुसूचित जमातीच्या वाट्याला येण्याची शक्यता असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. कारण 2004 पासुन अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईत झालेला नाही. त्यामुळे आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीचा अवलंब झाल्यास यंदा मुंबई महानगरपालिकेत अनुसूचित जातीचा महापौर बसेल. अनुसुचित जमातीचे नगरसेवक फक्त ठाकरेंच्या शिवसेनेत निवडून आले आहेत. त्यामुळे जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाली तर महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट ओळखून उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल, हे वक्तव्य केल्याची चर्चा आता रंगली आहे.
जुन्या चक्राकार पद्धतीचा अवलंब न होता नवीन चक्राकार पद्धतीने जरी सोडत काढली आणि त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची चिठ्ठी निघाली तरीही भाजप आणि शिवसेनेची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा एकही नगरसेवक नाही. अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेचे राजकारण कोळून प्यायलेल्या उद्धव ठाकरे यांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे यंदा पालिकेत आपली सत्ता आली नाही तरी महापौरपदी शिवसेनेचा (उबाठा) नगरसेवक बसू शकतो, याचा अंदाज उद्धव ठाकरे यांना आला असावा आणि त्यांनी महापौरपदाबाबत सूचक वक्तव्य केले असावे, असे सांगितले जात आहे.

COMMENTS