ग्राहकांना भरली धडकी ! जळगाव- शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी ...
ग्राहकांना भरली धडकी !
जळगाव- शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी मोठी दरवाढ नोंदविण्यात आली. दोन्ही धातुंचे दर पुन्हा सुसाट सुटल्याने ग्राहकांना चांगलीच धडक भरली. सुवर्ण व्यावसायिकांमधूनही नवीन दरवाढीची चिंता व्यक्त करण्यात आली.
व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कडक धोरणाचा परिणाम आता जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक आर्थिक वातावरणात अनिश्चितता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर होत आहे. सुरक्षित गुंतवणुकीकडे झुकणारा कल वाढल्याने सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावरील निर्बंध अधिक कडक केल्याने जागतिक ऊर्जा बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झाला आहे. तेल उत्पादन आणि निर्यातीत अडथळे येण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता वाढली आहे.
दरम्यान, डॉलरची कमकुवत स्थिती गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदी, वाढते व्याजदर आणि भू-राजकीय प्रश्न यामुळे डॉलरवर दबाव निर्माण झाला आहे. परिणामी, गुंतवणूकदार डॉलरऐवजी सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीकडे वळताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक पातळीवरील राजकीय संघर्ष, आर्थिक निर्बंध आणि अनिश्चित धोरणांमुळे येत्या काळातही दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. विशेषतः दीर्घकालीन गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांचा शोध घेत असल्याने सोन्या-चांदीला अधिक मागणी राहणार आहे. एकूणच, व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईचा परिणाम केवळ त्या देशापुरता मर्यादित न राहता जागतिक बाजारपेठांवर उमटत आहे. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत सुरक्षित आश्रयस्थानातील गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.
सोन्याच्या दरात किती वाढ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी ३०९ रूपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३८ हजार ७४१ रूपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, सोमवारी दिवसभरात १८५४ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४० हजार ५९५ रूपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी ८२४ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४१ हजार ४१९ रूपयांपर्यंत पोहोचले.
चांदीच्या दरात किती वाढ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी १०३० रूपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४३ हजार रूपयांवर स्थिरावले होते. मात्र, सोमवारी दिवसभरात तब्बल ६१८० रूपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४९ हजार २६० रूपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी ४३२० रूपायांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५३ हजार ५९० रूपयांपर्यंत वधारले.

COMMENTS